शाखा
हवाई मार्ग :-
सर्वात जवळचा विमान तळ पूणे येथे असुन तेथुन कोंझर गाव 200 किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वे मार्ग :-
सर्वात जवळची कोकण रेल्वे स्थानके माणगाव व वीर येथे असुन तेथुन अनुक्रमे 50 किलोमीटर अंतराव आहे व रस्त्याने जोडलेले आहे.
इतर वाहनाने :-
कोंझर गावी पोहचन्यासाठी अहमदाबाद पासुन अहमदाबाद, बरोडा, सुरत, नवसारी, वलसाड, वापी, भिवंडी, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, इंदापूर, माणगाव, लोणेरा, महाड येथे पोहचाल. महाड बस स्थानकावरून बस प्रवास व शिवाजी चोकमधून मिनिडोअर प्रवास करून कोंझर गावी पोहचु शकाल.
(महाड ते कोंझर अंतर 17 किलोमीटर आहे)
श्री कोंझर ग्रामस्थ मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे
इतिहास

ιι श्री वाघजाई माता प्रसन्न ιι

कोंझर ग्रामस्थ मंडळ, कोंझर

आमची जन्मभूमी कोंझर ...!!! कोंझर गाव, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड दुर्गाच्या पायथ्याशी वसलेले आहे. आपल्या गावाचे नाव अमुकच का ? असे सर्वांच्या मनात कुतूहल जागृत होणे स्वाभाविकच आहे. आम्ही लहानपणापासून आमच्या गावाच्या नावाबद्दल आख्यायिका ऐकून आहोत. आमच्या गावची रचना मात्र एका अभेध्य  किल्ल्या प्रमाणे वाटते. गावाच्या उत्तर – दक्षिण दिशेस प्रवेशद्वारावर हनुमंताची मंदिरे आहेत. पश्चिम दिशेस ग्रामदैवत वाघजाई मातेचे स्वयंभू स्थान आहे. तर पूर्वेस अभेध्य रायगड.

महाराष्ट्राच्या आराध्य दैवत तुळजापूर भवानीच्या कृपाशीर्वादाने, गोब्राह्मण प्रतिपालक हिंदुपतपादशाह छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या स्वराज्यातील हत्ती तळ (कुंजर तळ) या ठिकाणी होते. कुंजर चा अपभ्रंश कोंझर म्हणून या ठीकाण्याला कोंझर हे नाव पडले असावे असा तर्क आहे. या साठी पुष्टी म्हणून उल्लेखावीसी वाटते ती ही की, त्याकाळी शिवाजी महाराजांच्या सैन्यातील घोडदळ स्वारीवर जाता येता कोंझर गाव व रायगडला जोडणाऱ्या रस्त्यादरम्यान घाटमाथ्यावर आपल्या घोडयांना पाणी दयायचे त्या परिसराला आजही घोडेटांकी असे संबोधतात व तेथील दोनतीन किलो मीटरच्या शेत जमीनीना घोडधाव असे आमचे शेतकरी उल्लेखतात. म्हणजेच सैन्यदलाची ये-जा कोंझर पर्यंत नेहमीच असावी व हत्तीचे तळ येथे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आम्हा सर्वाना राखणारी वाघजाई माता आमच्या गावचे ग्रामदैवत आहे. वाघजाई मातेचे स्वयंभू स्थान गावाच्या पश्चिमेकडून वाहणाऱ्या गांधारी नदीच्या रम्य किनारी उंच झाडाच्या कीर्द राई मध्ये आहे. तसेच बोरजाई मातेचे स्वयंभू स्थान गावाच्या दक्षिणेस आहे. वाघजाई मातेच्या कृपाशिर्वादाने आज ही भक्त गण सुखा समाधानाने नांदत आहेत. तिच्या आशिर्वादामुळेच सर्व कोंझर वासीयांचे अनेक संकटापासून संरक्षण झाले आहे.

    आई वाघजाईच्या कृपा प्रसादामुळे अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. या स्वयंभू स्थानाबद्दल अभिमानाने आणी श्रद्धेने येथे लिहावेसे वाटते. आईचे सत्व महिमा अगाध आहे. आईच्या स्वयंभू स्थानाच्या परिसरात भक्तांचे पाउल पडताच व्याघ्र गर्जना सारखा आवाज कानी  ऐकू यायचा. या आवाजाने ते स्थान मंगलमय व्हायचे, व एक प्रकारे या आवाजाने मन गडबडून जाऊन आपोआप दोन्ही हात जुळून येवून आईला नतमस्तक व्हायचे. मन प्रसन्न व्हायचे. हा अनुभव वरिष्ठ ग्रामस्थ आज ही सांगतात. धन्य आई!! वाघजाई माता.

    दैनंदिन पुजेचे साठी ग्रामस्थांनी स्ववर्गणीतून एक भव्य मंदिर गावाच्या मध्यभागी उभारले आहे. या ठिकाणाहून आपण त्या अभेध्य दुर्गराजाचे दर्शन घेऊ शकतो. हे सुद्धा कळत नकळत घडलेले आश्चर्यच आहे.

शैक्षणिक वाटचाल:- आई वाघजाईच्या कृपाशीर्वादाने व पूर्व पुण्याईमुळे येथील ग्रामस्थांना एक विलक्षण दूरदृष्टी होती. आणी म्हणूनच सन १९६९ साली या दुर्गम भागातील काळाची गरज ओळखून जिजामाता माध्यमिक विद्यालय, कोंझर ची स्थापना केली. आजूबाजूच्या चौदा गावाच्या परिसरात शिक्षणाची सोयच नसल्याने उचललेले हे पाऊल म्हणजे एक शैक्षणिक क्रांती होय. आमचे पूर्वज कै. द्वारकू भिकाराम घोलप, कै. सुभेदार शंकर पांडुरंग भद्रिके, कै. बाळू ह्बाजी घोलप, कै. सीताराम संभू महाडीक, श्री शंकर तुकाराम कदम या स्थानिक ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी तसेच शहरवासियापैकी कै. सखाराम खेळू शिंदे, श्री कृष्णा परबत पवार, श्री वासुदेव शिवराम कदम, श्री शिवराम गोविंद पवार, कै. सीताराम तुकाराम पवार, श्री पांडुरंग अमृता मगर, श्री शांताराम गेणु महाडीक, श्री गणपत विठोबा देवगीरकर, श्री मनोहर राजाराम घोलप, कै. तुकाराम गेणु शिंदे, श्री भालचंद्र (बबनराव) तुळशीराम कदम इत्यादी, यांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे आणि सर्व ग्रामस्थांनी केलेल्या आर्थिक व श्रमदानाने, चाकरमनीच्या आर्थिक पाठबळामुळे ह्या छोट्याशा रोपटयाचे आज आम्ही मोठा वृक्ष झालेला पाहत आहोत. सर्व तरुणांचे शिक्षण याच विद्यालयात होवून एक सुजाण सुशिक्षित पिढी निर्माण झाली हि मोठी जमेची बाजू आहे. अनेक खेड्यांमधून आलेले तरूण येथेच शिक्षण घेवून आज आपल्या कुंटुबाला आर्थिक आधार देत असताना पाहून कोंझर ग्रामस्थांना आपले जीवन सार्थकि लागल्याचे परम समाधान वाटत आहे. यामध्ये कोंझर गावातील विद्यार्थ्यांचे यश नेत्र दीपक आहे. इंजिनियर्स, डॉक्टर्स, शिक्षक आणि औषध उत्पादन क्षेत्रातील कंपन्यातून महत्वाच्या उच्चपदावर कार्य करणारी पिढी कोंझर गावातून निर्माण झाली आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून येथील कुटूंब गुण्या गोविंदाने, समाधानाने पिढयान पिढया नांदत आहेत. सदर विद्यालयाच्या उभारणीसाठी आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थांनी सुद्धा आपले योगदान दिले आहे. पाचाड, वाळसुरे, वरंडोली, नेराव, दत्तवाडी, कोतुर्डे, कोंडरान, सांदोशी, पुनाडे, पुनाडेवाडी, निजामपूर, रायगडवाडी, सावरट, वारंगी, वाघोली, करमर, चापगाव, खर्डी, तळोशी, घरोशीवाडी, वरेकोंड, इत्यादी गावातील ग्रामस्थानी उल्लेखनीय मदत केली.

    या शैक्षणिक वाटचालीमध्ये पूर्व प्राथमिक शाळा कोंझर या शाळेचे योगदान अविस्मरणीय आहे. माध्यमिक शाळेसाठी चांगले गुणवंत विद्यार्थी घडविण्याची जवाबदारी मोठया हिंमतीने या शाळेने स्वीकारली होती. कै. सुंभे  गुरुजी, कै. मोहिते गुरुजी,   कै. कीर्तने गुरुजी यांनी केलेले प्रयत्न व अपार मेहनत शिक्षणाचा पाया रचण्यासाठी कामी आली. त्यांच्यामुळे गावांतील वरिष्ठ व्यक्ती सातवी पर्यंतचे शिक्षण घेऊन कुटुंबाच्या उदरनिर्वाह्साठी शहरात स्थलांतरित होवून आई वडिलांना, भावंडाना आधार देते झाले. म्हणून अशा थोर गुरुजींना नतमस्तक झाल्याशिवाय कोंझरचा इतिहास व यशस्वी घोडदौड लिहणे म्हणजे पाया उभारण्याशिवाय मंदिर बांधणे होय !!! आम्ही सर्व ग्रामस्थ तरुण या सर्वापुढे नतमस्तक होवून त्यांच्या प्रति आमची कृतज्ञता व्यक्त करतो.

        जिजामाता विद्यालय हि शाळा काही वर्षातच तालुक्यामध्ये उत्तम शिक्षणासाठी नावा रुपाला आली. शाळा स्थापनेपासून ते आज पर्यंत आपल्या कुटूंबासहीत आलेले अनेक शिक्षक या ग्रामस्थांबरोबर  मोठ्या आत्मियतेने आयुष्याची २० ते ३० वर्ष घालवून परत जाताना जड अंत:करणाने गेले. ग्रामस्थांनी त्यांना आपल्या नातलगां पेक्षाही जास्त प्रेम, आदर देवून आपलेसे केले. अहोरात्र करून येथील दुर्गम भागातील विद्यार्थांचे भविष्य उज्ज्वल केले. शाळेचे शिस्तप्रिय व अभ्यासु शिक्षकामध्ये मुख्याध्यापक (सेवानिवृत्ती) श्री सावंत सर तसेच या दुर्गमभागात यशस्वी पणे गरीब विद्यार्थाना इंग्रजी विषयाचा प्रभावीपणे व मजबूत पाया घालून ज्यांनी दिला ते सर्वांचे लाडके व आदरणीय सर  श्री भरत राजाराम पाटील म्हणजे पाटील सर, तसेच श्री भोसले सर, श्री घोडके सर, सौ. सावंत मॅडम, श्री धोंगडे सर, श्री चिखले सर, सौ. नेत्रा गांधी मॅडम, इत्यादी शिक्षकांचे सर्व पालक आभार व्यक्त करतात. तसेच शाळेचा पाया भरणी पासून इमाने इतबारे सेवा करणारे आणि आजूबाजूच्या गावामध्ये सुपरिचित असणारे शिक्षकेतर कर्मचारी स्थानिक ग्रामस्थ श्री. खंडोजी गोविंद पवार यांनी सुद्धा या शाळेसाठी मोठे योगदान केले आहे. कै.शांताराम तुकाराम कदम (कदम सर) आणि कै. वसंत तुकाराम कदम यांच्या लेखणीने या विद्यालयाच्या शासकीय प्रशासकीय कामकाजाची उत्तम रीत्या धुरा संभाळली होती. शाळेचे इतर गावांतील माजी विध्यार्थी आपल्याला घडविनाऱ्या विद्यालयाला भेट देवून कृतज्ञता व्यक्त करतात.

गेल्या दशकभरात (२००५ पासून) या शाळेचा सर्वांगीण विकास झालेला आहे. येथे आणखी एक भरीव यशाचा उल्लेख करावासा वाटतो. दहा वर्षोपूर्वी श्री बाळासाहेब आणि त्यांची धर्मपत्नी, हे दांपत्य या शाळेत गुरुजी म्हणून लाभले त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे थोड्याश्या मंदगतीने चाललेल्या वाटचालीला वेग येवून या शाळेने जिल्ह्यामध्ये  आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ग्रामस्थानी दिलेल्या मदतीचा हात, घडविलेले गुणवंत विद्यार्थी आणि सौ. व श्री बारगजे गुरुजी यांचा परिश्रमाचा परिपाक म्हणून रायगड जिल्हा परिषदे ने आयोजित केलेल्या पुरस्काराची कोंझर शाळा मानकरी ठरली. या बक्षीसामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली. सर्व शासकीय अधिकारी, त्यांच्या गाड्यांचे ताफे कोंझर मध्ये शाळेची प्रगती पहायला विसावू लागले. अनेक शिक्षण प्रेमी व्यक्तींनी तसेच सहशिक्षकांनी ही किमया साधणाऱ्या आमच्या चुणचुणीत विद्यार्थ्यांचे व गुरुजी दांपत्यांचे अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक क्रीडा क्षेत्रामध्ये आलेख उंचावत आहे. या साठी सर्व शहरवासीय व स्थानिक पालक या प्रेमळ अभ्यासू व मेहनती शिक्षकांचे आभार मानत आहेत.

सांस्कृतिक वाटचाल:कोंझर ग्रामस्थ हे सांस्कृतिक क्षेत्रात गेली १०० वर्षापासून या रायगड विभागात आपले अधिराज्य गाजवत आहेत. वैयक्तिक कला गुणांना वाव देत, अर्वाचीन संस्कृति जपत या गावाने संपूर्ण परिसरात, तालुक्यात आपला ठसा उमटविला आहे. सर्वश्रुत असणारे कोंझर ग्रामस्थांचे भजन म्हणजे आजूबाजूच्या गावातील लोकांना संगीतमय व मधुर आवाजाची मेजवानीच असायची !!! श्री खंडोजी गोविंद पवार व श्री शंकर तुकाराम कदम  यांची गोड व उच्च स्वरातील भजन, भारुडे, गौळणी ऐकून श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे. केव्हा पहाट व्हायची हे सुध्धा श्रोत्यांना कळायचे नाही !!! खेडोपाड्यातील महिला वर्ग पहाट पाण्याला जात येत असता डोक्यावर पाण्याने भरलेली हंडी घेवून कान तृप्त होईपर्यंत हे भजन ऐकण्यासाठी उभ्या रहात असत !!! यावरून या परिसरात या दोन मान्य वरांची भजन सम्राट म्हणून ख्याती आहे. श्री खंडोजी पवार आज वयाच्या ७० व्या वर्षी गायला लागले तर तो स्वर ऐकून मन ईश्वरचरणी लीन होते एवढी जादू या आवाजात आहे. या भजनामध्ये अवर्णीय साथ होती ती मृदुगांची !!! कै. राजाराम बाबाजी कुमकर यांच्या मृदुंग वादनाने सर्वांची मने हेलावून जायची. असा कलाकार पुन्हा मिळाला नाही याची  खंत कोंझर वासियांना आहे. या भजनात अनेक कलाकार होते. ह्या  सर्वांचे एक जबरदस्त रसायन बनले होते. या दोन भजनी बुवांना साथ असायची ती श्री सोनू घोलप, कै. शंकर पवार उर्फ (भाऊ),  कै. मारुती शिंदे, (वादक) श्री बारकू जाधव, श्री राजाराम कदम, कै. बाळू मोरे, श्री. यशवंत कदम, कै.गंगाराम कदम, श्री.पांडुरंग मोहिते, श्री.शंकर जाधव, श्री.द्वारकु महाडीक, श्री. तुकाराम पवार, श्री शिवाजी जयराम पवार इत्यादींच्या मधुर आवाजाने भजनाला रंगत यायची. भजनाच्या स्थापने साठी कै. गोपाल रेनोसे, कै.बाबू लक्ष्मण खरोसे यांचा सुध्धा मोठा हातभार आहे.

२०-२५ वर्षापूर्वी गौरी गणपतीच्या नाचांची खूप चढा ओढ असायची. या नाचामध्ये सुद्धा कोंझर गावचे नाचाचे अविष्कार पाहण्यासाठी खूप लांबून लोक यायचे. या नाचाची गायकीची धुरा श्री. यशवंत बाळू कदम यांनी यशस्वी पणे संभाळली. आपल्या गोड आवाजाने श्रोत्याना तल्लीन करायचे. डोळ्याची पापणी उघडझाप व्हायच्या. आत नाचाचा थरार दाखवणारे श्री. राजेंद्र शंकर भद्रिके,  श्री. शरद कदम, श्री. सुरेश कदम, श्री. शांताराम जगताप, श्री. नामदेव पवार, श्री. महादेव पवार, श्री. गणपत पवार, श्री. विठ्ठल गोळे, श्री. पांडुरंग मोरे,    श्री. गणपत शिंदे (चालक), श्री. वामन महाडीक, इत्यादींच्या कलेकडे पाहून लोक आश्चर्याने पहात रहायचे.

    या सर्वाना आपल्या ढोलकीच्या तालावर नाचायला लावणारे ढोलकी वादक श्री. गोपाळ मोरे या क्षेत्रात नावाजलेले ढोलकी वादक आहेत. त्यांच्या सारखा ढोलकी वादक त्यावेळी या खोर्यात नव्हताच. त्यांना साथ होती ती श्री. सूर्यकांत कदमांची आणि झुमरा वादक श्री. सुंदर कदम यांची. कोंझर ग्रामस्थांचे तमाशा मंडळ सुद्धा नावाजलेले होते. यामध्ये कै. शंकर लक्ष्मण घोलप, कै, मारुती शिंदे कै. तुकाराम पांडुरंग महाडीक यांची विनोदी अदाकारी सर्वांना भावायची. नाटय सम्राट बाल गंधर्व सारखे या गावातील कलाकार वेगवेगळ्या भूमिका साकारायचे. त्यात स्त्रीपात्र सुद्धा ! ग्रामस्थ्यांचे दही हंडी निमित्त असणारा नाच तर या पंचक्रोशीत कोठेच पाहायेला मिळत नाही, इतका सुंदर रित्या केला जातो आणि शांतता पूर्ण हंडी फोडली जाते.

क्रीडा क्षेत्रातील कामगिरी:- क्रिकेट हा संपूर्ण जगभर प्रसिद्धीस आलेला खेळ या खेळाची बीजे तीस वर्षापूर्वी कोंझर गावात काही उत्साही तरुणांनी पेरली. ती इतकी खोलवर रुजली कि या खेळात संपूर्ण तालुक्यात प्रथम क्रमांकाचा संघ म्हणून लवकरच मान्यता मिळाली. तंत्रशुद्ध फलंदाजी, अचूक व भेदक गोलंदाजी आणि गरुडा सारखे सावज टिपणारे क्षेत्ररक्षण या मिश्रणामुळे या संघासमोर शहरी विभागातल्या संघाचे सुद्धा सहजरीत्या पानिपत व्हायचे. या संघाच्या व खेळाच्या जडणघडणी साठी सर्वश्री श्री.नामदेव घोलप, श्री. संजय चिखले, श्री.राजेंद्र चिखले, श्री. सूर्यकांत कदम, श्री.प्रभाकर साटम, श्री. लक्ष्मण पवार, श्री. अरुण जैतपाल, श्री शंकर बाबू महाडीक, श्री अजित चिखले, श्री मुकुंद मोरे,  कै. अनिल खंडोजी पवार, कै. विलास वसंत शिंदे, श्री. प्रभाकर शिंदे, श्री अनंत कदम, इत्यादी यांचा सिहांचा वाटा होता. या नंतरच्या काळात ही धुरा           श्री. उन्मेश कदम, श्री. प्रशांत पवार, श्री. संतोष देवगिरकर, श्री. विठ्ठल देवगिरकर, श्री. प्रकाश कदम, श्री. दत्ताराम भद्रिके, श्री जयेश मोरे, श्री. पांडुरंग भद्रिके, श्री. राजेंद्र पवार, श्री. मोहन मिरजे, श्री. सुनील पवार, श्री. शैलेश कदम, श्री. संतोष कदम, श्री. संदीप सकपाळ, श्री. संदीप कदम, कु.अविनाश अशोक चव्हाण, श्री. अजय पवार, कु. भरत कदम, कु. विकी कडू इत्यादी नवतरुण खेलाडूंनी आजतागायत यशस्वीपणे संभाळली. येथे ३० वर्षापूर्वी संघासाठी आर्थिक अडचण असताना, रु.२५ /- जवळ नसताना श्री. चंद्रकांत रामचंद्र कदम यांनी मदती चा हात पुढे करून सर्व खेळाडूना दिलासा दिला व जिंकून गावाचे नाव मोठे करा असा प्रेमाचा सल्ला दिला. तो लक्षात ठेवून या संघाचे नामकरण “चंदू क्रिकेट क्लब” असे केले. अशा खेळाच्या प्रदर्शनातून आजूबाजूच्या गावातील खेळांडूना सुद्धा प्रेरणा मिळाली. अनेक वेळा कोंझर येथे क्रिकेटचे सामने भरवून आजूबाजूच्या खेड्यातील खेळांडूना खेळाची संधी उपलब्ध करून दिली व त्यांच्या मध्ये खेळाडू वृत्ती बिंबवली.

राजकीय वाटचाल:- एक आदर्श गाव व ग्रामस्थांची एकजूट यामुळे कोंझर गाव सर्वांना हवेसे वाटते. या गावाबद्दल आदर  निर्माण झाला आहे. शासनाचे अधिकारी, राजकीय पक्षांचे नेते या गावाकडे आकर्षिले जातात. त्यांच्या वारंवार  भेटीतून आमच्या ग्रामस्थ्यांची छाप शासकीय अधिकार्यांवर पडून बरीचसे कामे तडीस जातात. येथे मुद्धाम उल्लेख करतो ! श्री. संजय चिखले (सर) यांनी महाड पंचायत समितीचे सभापती पद भूषविले आहे. आणि या कामगिरी द्वारे कोंझर गावाच्या इतिहासात सोनेरी पान लिहून ठेवले आहे. त्यांच्या या यशाचे श्रेय ग्रामस्थांची एकजूट आणि गावाच्या प्रगती साठी वाटेल ते करण्याच्या तळमळीला जाते. त्यांच्या निवडणुकीच्या वेळी ग्रामस्थ्यांनी अपार परिश्रम घेवून पूर्ण नाते – रायगड विभागात अक्षरश: पायाची चाळण करून आपल्या लाडक्या व आपल्याच गावातल्या उमेदवाराचा प्रचार केला. याचा हेवा अजूनही आजूबाजूच्या इतर गावातील नागरिकाना वाटतो. या परिश्रमास आशीर्वाद लाभला तो ग्राम दैवत वाघजाई मातेचा ! नवसाला पावणारी, जागृत देवस्थान अशी ख्याती असणारी ती व्याघ्रेश्वरी, ग्रामस्थ्यांच्या आणि चिखले सरांच्या मनातील भाव ओळखणार नाही असे कसे होईल ? भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या त्या अदभूत शक्तिने आपल्या लेकरांच्या मेहनतीचे सोने केले. या आशीर्वादाचे फळ म्हणून सरांना नुसतेच पंचायत समिती सभासदत्त्व नव्हेतर सभापदी पद दिले. यामध्ये कोंझर गांव म्हणजे महाड – पोलादपूर तालुक्यातील माझ्या जिव्हाळ्याचे हक्काच्या माणसांचे गाव असे मानणारे त्यावेळेचे सन्माननीय आमदार श्री. माणिकराव जगताप यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांचे सर्व ग्रामस्थानी आभार व्यक्त केले. त्यानंतर अनेक विकास कामाच्या योजना इथे राबविल्या गेल्या.

स्वयंफुर्त कामगिरी :- सामाजिक क्षेत्रात काम करून आपली छाप पाडून आदर्श गाव निर्माण झाला. या गावातील अनेक सुपुत्र आपल्या जन्मभूमीचे नाव सर्व दिशांना अजरामर करताना दिसतात. यात उल्लेखनीय कामगिरी केलेले शिवभक्त, शिव इतिहास प्रेमी माननीय श्री. सुरेश वाडकर यांचा सिहांचा वाटा आहे. छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांचा इतिहास यांवर अपार श्रद्धा असणारे हे शिवप्रेमी त्यांनी शिवदुर्ग रायगडला १००० फेर्या घालण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या सोबत इतर गडांची माहिती गोळा करण्याचे आगळे वेगळे काम त्यांनी हाती घेतले आहे. सुरेश दादांनी जवळ-जवळ ७५० फेर्या अभ्यासात्मक स्वरूपाच्या पूर्ण केल्या. त्यामध्ये त्यांनी राजांचा इतिहास संपूर्ण   समजून घेतला. ऊन वारा पाऊस या सर्वांची तमा न बाळगता ध्येयाने प्रेरित झालेल्या या शिवप्रेमीने आयुष्याची बरीच वर्ष कामी लावली. त्यामुळेच यांची नोंद महाराष्ट्र शासन दरबारी झाली, आणि त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला. महाराष्ट्राचे शिव इतिहास तज्ञ माननीय श्री बाबा साहेब पुरंदरे यांनी सुद्धा या उल्लेखनीय कामगिरी बदद्ल त्यांच्या पाठीवर अभिनंदनाची थाप मारली. अशा प्रकारे ते संपूर्ण महाराष्ट्रात परिचयाचे झाले. आणि हे सुपुत्र आहेत कोंझरचे याचा आम्हाला अभिमान आहे. तसेच महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत सुद्धा या गावचे सुपुत्र  झळकलेले आहेत. यामध्ये प्रकर्षाने श्री रामचंद्र गोपाळ कदम यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी महाड तालुक्याचे तहसीलदार पद भूषविले कोंझरच्या शिरपेचात आणखी एक मोरपिसाची भर टाकली आहे.

न्याय व्यवस्था:- कोंझर गाव सुशील, सुझान व विनम्र नागरिकांचे वस्तिस्थान आहे. येथील ग्रामस्थ एकमेकांशी खूप आदराने वागतात. कारण येथे सुसंस्कृत, शांतताप्रिय लोक पूर्वी पासूनच होते. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा तंटा विकोपाला जात नाही किंवा गेला नाही. याचे मूळ कारण म्हणजे, वाद-विवाद कितीही गुंतागुंतीचा असला तरी सर्वांना हमखास योग्य न्याय मिळण्याची खात्री  आहे. व तसा न्याय स्थानिक ग्रामस्थ खूप खुबीने देतात. या न्याय दानासाठी एक पंच कमिटी आहे. यांनी दिलेला निर्णय अंतिम ठरतो. सर्व ग्रामस्थांचा या न्याय प्रणालीवर अत्यंत विश्वास आहे. सुभेदार कै. श्री. शंकर पांडुरंग भद्रिके, कै. श्री. गंगाराम धोंडू कदम, कै. सिताराम संभू महाडीक, श्री गणपत विठोबा देवगीरकर यासारख्या वरिष्ठ व्यक्तींची न्याय निष्पक्षता आजही चर्चीली जाते  व त्यांचे न्यायदानाचे कौशल्य स्मरुन वाघजाई मंदिराच्या प्रांगणात न्याय निवाडा केला जातो. या सर्व स्थितीत न्याय दानाचे भरीव काम कोंझर ग्रामस्थ्यांचे अध्यक्ष श्री. शशिकांत शंकर भद्रिके, तंटा मुक्ति समितीचे अध्यक्ष श्री. खंडोजी गोविंद पवार तसेच श्री. तुकाराम विठोबा पवार, श्री लक्ष्मण  शिवाजी पवार (सरपंच), श्री. विजय हरी कदम (उपसरपंच), श्री. मनोहर गोपाळ कदम, श्री. यशवंत बाळू कदम, श्री. शंकर तुकाराम कदम, श्री. शरद खंडू कदम, श्री शंकर बाळू सकपाळ, श्री. कृष्णा भागोजी कदम, श्री. संजय वालगुडे, श्री. सीताराम पांडुरंग कदम, श्री. किशन बाबू पवार, इत्यादी मान्यवर व्यक्ति एक मताने न्याय निवाड्याचे काम पाहतात. येथे खास नोंद करावयाशी वाटते, ती हि कि महाराष्ट्र शासनाचा “ तंटा मुक्त गांव ” हा पुरस्कार आम्हाला प्राप्त झाला आहे. सर्व ग्रामस्थ्यांचे अभिनंदन !!! गावातील न्याय व्यवस्था अशीच अबाधित रहावी हीच अपेक्षा.

    ग्राम पातळीवर कार्य करीत असताना सर्वच ग्रामस्थ एक मताने काम करतात. याबरोबर सर्व ग्रामस्थांनी सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करणारे तरूण कार्यकर्ते निर्माण होत आहेत. त्यापैकी श्री चंद्रकांत घोलप,    श्री. अरविंद वाडकर, श्री. नामदेव जाधव, श्री. सीताराम घोलप, श्री. विजय मोहिते, श्री. अशोक खातू, श्री. निलेश देवगीरकर, श्री. राजेंद्र रेवणे, श्री. उन्मेश कदम, श्री संतोष कदम, कु. अविनाश चव्हाण, श्री. अनंत शंकर कदम, इत्यादी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. गावात न्यायव्यवस्था उत्तम राखण्यासाठी सर्व नागरिकांना सभेसाठी एकत्र करण्याचे बहुमोलाचे कार्य अनुक्रमे कै. लक्ष्मण गणपत सकपाळ, श्री बारकू सखाराम जाधव, श्री शंकर राजाराम कुमकर यांनी योग्यपणे पार पडले आहे. ग्रामव्यवस्थेनुसार  कै. दत्तू हनवती कदम, कै.पांडुरंग दौलती कदम, श्री राजाराम पांडुरंग कदम व श्री महादेव पांडुरंग कदम यांनी “ पोलीस पाटील ” म्हणून शासन आणि नागरिक यांमधील समन्वय साधला. 

अध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर:- येथील नागरिक मोठ्या भक्ती भावाने दर वर्षी माघ त्रयोदशीला ग्रामदैवत वाघजाई उत्सव साजरा करतात. तसेच हनुमान जयंती, नवरात्रौत्सव आणि इतर सण साजरे करून गावातील मांगल्याचे वातवरण कायम ठेवतात. गावामध्ये भक्तिमार्गाचा प्रसार खूप पूर्वीपासूनच आहे. तपोनिधी गणेशनाथ महाराज संप्रदाय, तपोनिधी बेटकर महाराज संप्रदाय असे दोन संप्रदाय लोकांची अध्यात्मिक प्रगती व्हावी म्हणून कार्य करीत आहे. तसेच परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या आशीर्वादाने स्वाध्याय परिवार सुध्धा मोलाची कामगिरी करत आहे.     

स्वंयपूर्ण कोंझर:- कोंझर गाव शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडां क्षेत्रात संपूर्ण रायगड विभागामध्ये अग्रेसर राहिला. अगदी १०० वर्षाहून अधिक काळापासून आमचे गाव सर्व सुखसोईनी युक्त आहे. ३५ वर्षापूर्वी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असताना तेव्हांचे कार्यकर्ते कै.परशुराम विठू पवार, कै.सुभेदार श्री शंकर पांडुरंग भद्रिके, कै.सिताराम संभू महाडीक, कै.बाळू ह्बाजी घोलप, कै.गंगाराम धोंडू कदम, कै. रामचंद्र कदम, (माजी व प्रथम सरपंच), श्री. बाळू काशीराम सकपाळ (माजी सरपंच), श्री शिवाजी जयराम पवार इत्यादी     मान्यवरांनी विचार विनिमय करून शासकीय दरबारातून तेव्हाचे महाड तालुक्याचे आमदार कै. शांताराम भाऊ फिलसे यांच्या सहमतीने व त्यांच्या परिश्रमाने गावामध्ये नळ पाणी योजना प्रथमच राबविली. त्या नंतरच थोडी फार स्थिती सुधारली. आजपर्यंत या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी         श्री. माणिकराव जगताप यांनी सुध्धा मदतीचा हात दिला आहे. नवनिर्वाचित आमदार श्री भरतशेठ गोगावले यांच्याकडून काही भरीव कामगिरीची अपेक्षा आहे.

गावकर्यांच्य दैनदिन गरजा भागविण्यासाठी दोन किराणामालाची दुकाने, पिठाची गिरणी, रेशनिंगचे स्वस्त धान्य दुकान, प्राथमिक, माध्यमिक शाळा व शेतीचे अवजारे बनविण्यासाठी श्री पांडुरंग वालेकरांची लोहार शाळा अशा सर्व बाबींनी गाव परिपूर्ण आहे. गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि डाकघर उपलब्ध आहे. विशेष करून आर्थिक गरजा भागविण्या साठी दोन पत संस्था कार्यरत आहे.  

    तसेच उल्लेखनीय असा गणेश मुर्ती बनविण्याची सुप्रसिद्ध कार्यशाळा (कारखान) सुधा कोंझरलाच आहे. श्री. सदानंद देवगिरकर आणि कुटुंबीय  श्रीगणेशाच्या व देवीच्या सुबक मुर्त्या बनविण्यात वर्षभर मग्न असतात. या मुर्त्यांसाठी  आजूबाजूच्या गावातून पेन, महाड, पुणे शहरातून खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

ग्रामपंचायत कोंझर :- १९५६ साली ग्रुप ग्रामपंचायत कोंझर-वालासुरे असी अस्तित्वात आली आणि त्या  ग्रुप ग्रामपंचायतचा पहिला सरपंच होण्याचा मान कै. द्वारकु रामजी घोलप यांना मिळाले. नंतर १९७७ साली कोंझर  ग्रामपंचायत स्वतंत्रपणे अस्तित्वात आली. तेव्हा पहिली सरपंचपद कै. श्रीपत कारभारी यांनी भूजाविले. त्यानंतर पुढील कै. रामचंद्र गोविंद कदम (सरपंच ), कै. परशुराम विठू पवार(उप सरपंच), कै. सीताराम शंभू महाडीक (सरपंच), श्री शंकर तुकाराम कदम(उप सरपंच), श्री. बाळू काशीराम सकपाळ (सरपंच), श्री गोपाल बाळू मोरे (उप सरपंच), कै. वासंती अशोक चव्हाण (सरपंच), सौ. सुमन सहदेव कदम (सरपंच), श्री लक्ष्मण शिवाजी पवार (उप सरपंच) असा व्यक्तींनी कार्यभार संभाळला.

         ग्रामपंचायत कोंझर, ही एक स्वयंपुर्ण, स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतचा आज तागायताचा इतिहास असा आहे कि इथे ग्रामपंचायतसाठी निवडणूक न होता सर्वानुमते सदस्य, सरपंच, उपसरपंच यांची निवड होते. या पंचवार्षिक कालावधी साठी श्री. लक्ष्मण शिवाजी पवार (सरपंच) आणि श्री विजय हरी कदम (उपसरपंच) यांची निवड झाली आहे. तसेच म्हणून श्री संतोष मनोहर कदम, सौ. उषा नामदेव पवार, सौ अनिता अनंत कदम, सौ संपदा संदीप खातू यांची निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीकडून प्रत्येक वेळेस काही भरीव कामाची अपेक्षा असते. इथे कै. वासंती अशोक चव्हाण(माजी सरपंच) व कै. अशोक काशीराम चव्हाण यांच्या भरीव कार्यसाठी उल्लेख करतो. रायगढ जिल्हा परिषद कडून आमच्या गावाला “ निर्मल गाव “ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ही सुध्धा एक जमेची बाजू आणि गर्वची बाब आहे. 

देश रक्षणार्थ  :- देश पारतंत्र्यात असताना  महात्मा गांधीनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाला खूप मोठा पाठींबा संपूर्ण देशभरातून मिळाला. तेव्हा या अग्निकुंडात स्वतःला झोकून देणारे  काही स्वतंत्र सेनानी कोंझर गावाचे होते. हे सांगताना छाती अभिमानाने भरून येते. त्यावेळी कै. विष्णू केरुशेठ खातू यांनी कोंझरचे प्रतिनिधित्व करून महाडच्या सत्याग्रही पर्यंत पोलिसांची नजर चुकवून ते पोहोचले.

         त्यानंतर देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी अनेकांनी सैन्यात भर्ती होऊन वारसा पुढे चालू ठेवला. कै. सुभेदार शंकर पांडुरंग भद्रिके, कै. धोंडू गणपत कदम, श्री तुकाराम विठोबा पवार(सेवानिवृत्त), श्री रामजी शेडगे (सेवानिवृत्त), श्री सुभाष सीताराम सकपाळ (सेवानिवृत्त), श्री विश्वास भिकू गोळे (सेवानिवृत्त), श्री नवनीत मनोहर घोलप (सेवानिवृत्त), श्री मुकेश द्वारकु महाडीक, श्री पांडुरंग अमृता मगर(सेवानिवृत्त),,श्री पांडुरंग शशिकांत भद्रिके, श्री विशाल विश्वास गोळे, , श्री .......... , श्रीधर साळुंखे यांनी परंपरा चालू ठेवली. 

दिलगिरी आणि आभार :- कोंझर आमची सर्वांची जन्मभूमी, आणि या जन्मभूमी बददल आम्हाला दोन शब्द लिहण्याला प्रेरणा आई वाघजाईने दिली व आमच्या कडून हे शब्द, हि अभूतपूर्व प्रेरणादायी गावाची कामगिरी लिहून घेतली म्हणून हे सर्व लिखाण आम्ही आईला अर्पण करतो. असेच भरीव कार्य  सर्वांकडून होवू दे आणि या गावाची कामगिरी उंचावत जाऊन, सर्वांना एकजुटीने राहण्याची सुद्द्बुद्धी दे अशी दोन्ही कर जोडुन प्रार्थना करतो. या गावाच्या जडणघडणीसाठी सर्व ग्रामस्थ, शहरवासीयांनी अपार मेहनत घेतली आणि त्यातूनच हे निर्माण झाले आहे. म्हणून आम्ही सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन करीत आहे व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा:. !!!  तत्पूर्वी आमच्या पासून कोणाचा कार्य गौरव राहिला असल्यास, उल्लेख राहिला असल्यास त्याबदद्ल आम्ही दिलगीरी व्यक्त करीत आहे . आपण वरिष्ठांनी, वडील नागरिकांनी आम्हा तरुणांना आपल्या जन्मभूमीच्या कार्यासाठी शुभ आशिर्वाद द्यावेत हि नम्र विनंती. धन्यवाद...

                                            शब्दांकन- श्री प्रशांत खंडोजी पवार 


             
 
 
Konzar Gav welcomes you . hit counter free
 
  Copyright © 2012 All Rights Reserved. Powered by : Witech Digital Solutions