ιι श्री वाघजाई माता प्रसन्न ιι
श्री कोंझर ग्रामस्थ मंडळ, कोंझर आमची जन्मभूमी “कोंझर” कोंझर गाव, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी “ रायगड “दुर्गाच्या पायथ्याशी वसलेले आहे. आपल्या गावाचे नाव अमुकच का? असे सर्वांच्या मनात कुतूहल जागे होणे स्वाभाविकच आहे. आम्ही लहानपणापासून आमच्या गावाच्या नावाबद्दल आख्यायिका ऐकून आहोत. आमच्या गावाची रचना मात्र एका अभेद्य किल्ल्या प्रमाणे वाटते. गावाच्या उत्तर-दक्षिण प्रवेशद्वारावर हनुमंताची मंदिरे आहेत. पश्चिम दिशेस ग्रामदैवत वाघजाई मातेचे स्वयंभू स्थान आहे. तर पूर्वेस अभेद्य रायगड. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत तुळजापूर भवानीच्या कृपाशिर्वादाने, गोब्राह्मण प्रतिपालक हिंदुपतपादशाह छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या स्वराज्यातील हत्ती तळ (कुंजर तळ) या ठिकाणी होते. “कुंजर” चा अपभ्रंश “कोंझर” म्हणून या ठिकाणाला कोंझर हे नाव पडले असावे असा तर्क आहे. या साठी पुष्टी म्हणून उल्लेखाविशी वाटते ती ही की, त्याकाळी शिवाजी महाराजांच्या सैन्यातील घोडदळ स्वारीवर जाता येता “कोंझर” गाव व रायगडला जोडणा-या रस्त्यादरम्यान घाटमाथ्यावर आपल्या घोडयांना पाणी दयायचे त्या परिसराला आजही “घोडटांकी” असे संबोधतात व तेथील दोनतीन किलो मीटरच्या शेत जमीनीना “ घोडेधाव” असे आमचे शेतकरी उल्लेखतात म्हणजेच सैन्यदलाची ये-जा “कोंझर” पर्यंत नेहमीच असावी व हत्तीचे तळ येथे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्हा सर्वाना राखणारी “वाघजाई” माता आमच्या गावचे ग्रामदैवत आहे. वाघजाई मातेचे “स्वयंभू” स्थान गावाच्या पश्चिमेकडून वाहणाऱ्या गांधारी नदीच्या रम्य किनारी उंच झाडाच्या कीर्द राई मध्ये आहे. तसेच बोरजाई मातेचे “स्वयंभू” स्थान गावाच्या दक्षिणेस आहे. वाघजाई मातेच्या कृपाआशिर्वादाने आज ही भक्त गण सुखा समाधाने नांदत आहेत तिच्या आशिर्वादामुळेच सर्व कोंझर वासीयांचे अनेक संकटापासून संरक्षण झाले आहे. आई वाघजाईच्या कृपा प्रसादामुळे अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. या स्वयंभू स्थानाबद्दल अभिमानाने आणी श्रद्धेने येथे लिहावेसे वाटते. आईचे सत्व महिमा अगाध आहे. आईच्या स्वयंभू स्थानाच्या परिसरात भक्तांचे पाउल पडताच व्याघ्र गर्जना सारखा आवाज कानी ऐकू यायचा. या आवाजाने ते स्थान मंगलमय व्हायचे, व एक प्रकारे या आवाजाने मन गडबडून जाऊन आपोआप दोन्ही हात जुळून येवून आईला नतमस्तक व्हायचे. मन प्रसन्न व्हायचे. हा अनुभव आज ही सांगतात. धन्य आई!! वाघजाई माता. दैनंदिन पजेचे साठी ग्रामस्थांनी स्ववर्गणीतून एक भव्य मंदिर गावाच्या मध्यभागी उभारले आहे. या ठिकाणाहून आपण त्या अभेदय दुर्गराजाचे दर्शन घेऊ शकतो. हे सुद्धा कळत नकळत घडलेले आश्चर्यच आहे.
|